मुंबईत ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई!
मर्सिडीज, ऑडी अन् अॅपलचे छाप असलेल्या ५ हजार गोळ्या, 6 कोटी किंमत
मुंबई : खरा पंचनामा
नेस्को येथील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने टिटवाळ्यात मोठी कारवाई केली.
एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या अमली पदार्थ वितरक महिलेच्या घरी छापा घालत पथकाने पार्टी ड्रग एक्स्टेंसीच्या तब्बल पाच हजार गोळ्या जप्त केल्या. त्याची किंमत सहा कोटींहून अधिक असून, इतक्या मोठ्या प्रमाणात या गोळ्या जप्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जाते.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक अनिल ढोले आणि सहकाऱ्यांनी १५ एप्रिलला साकीनाका येथे छापा घालत इरफान अली अन्सारी या तरुणास अटक केली. त्याच्याकडे एक्स्टेंसीच्या २०० गोळ्या सापडल्या होत्या. याबाबतच्या चौकशीत ए. पॉल नामक महिलेचे तसेच तिच्याकडून इरफानपर्यंत एक्स्टेंसी गोळ्या पोहोचवणाऱ्या सुफियानचे नाव पुढे आले. त्यानुसार सुफियानला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून पॉलचा ठावठिकाणा घेत टिटवाळ्यात छापा घातला. साकीनाका येथील इरफान आणि पॉल यांची ओळख कारागृहात झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पथकाला मिळाली. त्याची खातरजमा केली जात आहे.
पॉल दोन महिन्यांपूर्वीच कल्याणहून टिटवाळ्यातील भाड्याच्या घरात स्थलांतरित झाली होती. अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरल्यानंतर अटक टाळण्यासाठी तिने ठाणे जिल्ह्यात भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य केले. ती ठरावीक कालावधीनंतर घर बदलत असे. अगदी विश्वासातील व्यक्तींना ती एक्स्टेंसी पुरवत असे.
पॉलच्या घरात पिवळ्या, निळ्या, जांभळी, राखाडी अशा विविध रंगांतील एक्स्टेंसी गोळ्यांचा साठा सापडला. त्यासोबत चार मोबाईल आणि सात ते आठ सिम कार्ड सापडली. काही वर्षांपर्यंत बार डान्सर म्हणून काम करणारी पॉल गेल्या काही वर्षांत पार्टी ड्रग्ज वितरक, पुरवठादार बनल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले. तिने हा साठा कोणाकडून, कुठल्या मार्गाने मिळवला, कोणाकोणाला विकला, याबाबत चौकशी सुरू आहे.
वनराई पोलिस, अमली पदार्थ विरोधी पथकाने पॉलच्या घरातून जप्त केलेल्या एक्स्टेंसी गोळ्यांवर महाराष्ट्राच्या नकाशासह मर्सिडीज बेंझ, ऑडी, अॅपल अशा विविध बँडचे बोधचिन्ह कोरलेले आढळले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.