Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमली पदार्थांचा वावर रोखणे आवाक्याबाहेर !

अमली पदार्थांचा वावर रोखणे आवाक्याबाहेर !

मुंबई : खरा पंचनामा 

गोरेगाव येथील नेस्कोतील कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे अशा कार्यक्रमातील अमली पदार्थांचा वावर पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. अमली पदार्थांचा वावर रोखणे कठीण आहे, असे मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणतात : जोपर्यंत तरुण स्वतःहून अमली पदार्थ नाकारीत नाही तोपर्यंत कितीही धाडी घातल्या तर त्याला आळा बसणे कठीण आहे. कोठून ना कोठून तो ते मिळवणारच. ती एक प्रकारची चटक आहे. मरेपर्यंत त्याचा पिच्छा सोडणार नाही. सध्या मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कारवाई कठोर केली असली तरी संपूर्णपणे नियंत्रण आणता आलेले नाही. पोलीस ठाण्याच्या पातळीवरही अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग स्थापन करण्यात आला आहे. तरीही अमली पदार्थ सापडतच आहेत. या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी हे मत व्यक्त केले आहे. तरुणांना अमली पदार्थांपासून परावृत्त करणे हाच एक पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

अमली पदार्थांचे लोण किती खोलवर पोहोचले आहे हे जाणून वेळीच लक्ष दिले तर हा प्रश्न काही अंशी नियंत्रणात राहू शकेल. बरेचदा आपले मूल व्यसनाधीन झाले आहे, हे पालक मान्यच करत नाहीत. मुलांनी पैसे चोरण्याच्या घटनेकडेही आज-काल दुर्लक्ष होताना दिसते. ही बाबही धोक्याची आहे. म्हणूनच प्रत्येक पालकाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहनही दीक्षित यांनी केले आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमारसारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्याद्वारे एक प्रकारचे छुपे युद्ध खेळले जात आहे. त्यामुळेच कधी काश्मीर, पंजाब, गुजरात, मणिपूर तर कधी महाराष्ट्रसारख्या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली तीस वर्षे पाकिस्तान ड्रोन, बोटी, सुरुंग, स्त्रिया आदींच्या मदतीने भारतात अमली पदार्थ पोहोचवत आहे. हे लक्षात घेऊन अमली पदार्थ विरोधातील ही लढाई भारत-पाकिस्तान वा भारत-अफगाणिस्तानमधील लढाई इतक्याच गांभीर्याने घेण्याखेरीज पर्याय नाही. केवळ भारताच्या आजूबाजूच्या नव्हे तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक मालाचे उत्पादन होते. हाच माल कंटेनरमध्ये भरून समुद्रमार्गे जगभर पोहोचवला जातो. तसाच तो भारतातही येतो आणि येथून अन्यत्र पोहोचवला जातो. त्यामुळे यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. तरच पुढची पिढी या संकटापासून सुरक्षित राहू शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांचे प्रपाठक राहिलेले पोलीस निरीक्षक सुनील चित्रे म्हणतात : अशा घटनांसाठी कॉर्पोरेट क्षेत्रात मिळणारी मोठी मोठी पॅकेजेसही जबाबदार आहेत. गरजेपेक्षा जास्त पैसा तरुण अथवा मध्यम वयात मिळाला तर अशा घटना घडतात. जर ही पॅकेजेस अर्धी केली तर मोबाईल फोन, मोटरगाड्या इत्यादी गोष्टींच्या किमतीदेखील अर्ध्याने कमी होऊ शकतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.