Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर

'नॉट रिचेबल' सहर शेख यांचे वडील मुंब्रा पोलिसांत हजर

ठाणे : खरा पंचनामा 

ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या (AIMIM) माजी नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत "करारा जबाब मिलेगा, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू," असा इशारा दिला आहे.

सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरितांसाठी 'नमुना 10' लागू असताना, युनिस शेख यांनी 'नमुना 8' चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला.

मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आलेले युनूस शेख पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्र्यात दिसले. ते म्हणाले की, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. करारा जवाब मिलेगा. तसेच जे काही आरोप आमच्यावरती करण्यात येत आहेत ते चुकीचे आहेत. मुलगी मोठी होते आहे म्हणून अनेकांना जळण होत आहे. म्हणून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचं शेख म्हणाले आहेत.

दरम्यान, सहर शेख 'नॉट रिचेबल' असताना वानखेडे स्टेडियमवर दिसून आल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. सहर शेख यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यावरही युनूस शेख यांनी भाष्य केलंय. तिने मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता युनूस शेख दोन दिवसात नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.