Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तहसीलदार कार्यालयावर एसीबीचा छापा; कारवाईनंतर अधिकारी फरार

तहसीलदार कार्यालयावर एसीबीचा छापा; कारवाईनंतर अधिकारी फरार

वसई : खरा पंचनामा 

वसई येथील अपर तहसीलदार (अकृषिक) कार्यालयातील भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ७लाख रुपयांची लाच स्वीकारताना अनिल प्रभाकर चौबल या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.

या प्रकरणात अपर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा थेट सहभाग असल्याचे समोर आले असून, कारवाईची चाहूल लागताच ते फरार झाले आहेत.

तक्रारदार यांची वसई पूर्वेकडील देपिवली येथे जमीन आहे. या जागेवरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून पाडले जाऊ नये आणि ही जागा अकृषिक (NA) करून द्यावी, यासाठी तब्बल ४० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तर अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी झाली होती, मात्र अखेर ७ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले.

तक्रारदाराने या मागणीबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. ७ लाख रुपयांची रोकड स्वीकारताना अपर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित खासगी व्यक्ती अनिल चौबल याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

या लाचखोरीच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून अपर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे यांचे नाव निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच धोत्रे कार्यालयातून फरार झाले. सध्या वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास नदाफ आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.