अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर, खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. "आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे," असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने कोठडी मंजूर केली. अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.