घरात सापडलेल्या कच्च्या नोंदीतून भोंदू खरातचा भांडाफोड
नाशिक : खरा पंचनामा
भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या खरातच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने टाकलेल्या धाडींमुळे मोठे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे १० कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, यामुळे तपासाला मोठा वेग आला आहे. प्राथमिक चौकशीत खरात यानी फसवणूक आणि खंडणीद्वारे मिळवलेला पैसा विविध जमिनींमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक भक्तांकडून पैसे उकळले आणि ते पैसे जमिनी खरेदीत गुंतवले. विशेष म्हणजे, या व्यवहारांपैकी अनेक व्यवहार अधिकृत नोंदणी न करता करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.
धाडीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक कच्च्या नोंदी आढळून आल्या आहेत. काही जमिनींचे व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. हे व्यवहार अधिकृत रजिस्ट्रेशन न करता फक्त लिखित स्वरूपात पूर्ण करण्यात आले होते. तसेच, काही प्रॉपर्टीची नोंदणी करण्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याचे समजते.
तपासात बेनामी मालमत्ता, बनावट व्यवहार आणि शेल कंपन्यांमार्फत गुंतवणुकीचे धागेदोरे सापडले आहेत. याशिवाय, नोंदणी न केलेल्या उत्पन्नाचेही पुरावे मिळाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. आर्थिक व्यवहारांची साखळी, निधीचा स्रोत आणि मालमत्तेची खरेदी-विक्री यांचा सखोल तपास सध्या सुरू आहे.
तपास यंत्रणा आता खरात आणि संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यांची सखोल छाननी करत आहेत. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आयकर विवरणपत्रे आणि इतर आर्थिक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. याशिवाय, या प्रकरणात सहभागी असण्याची शक्यता असलेल्या सहकारी, नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदारांचीही चौकशी होणार आहे.
संशयास्पद व्यवहार आढळल्यास संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, तपासाच्या निष्कर्षानुसार मनी लॉन्ड्रिंगसह इतर गुन्ह्यांखाली आणखी प्रकरणे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रकरणाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.