विधान परिषदेत नवा खेळ?
काँग्रेसचा बडा नेता रात्री अचानक 'वर्षा'वर; शिंदेंना भेटला राष्ट्रवादी प्रवक्ता
मुंबई : खरा पंचनामा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांच्या बैठका, अचानक भेटीगाठी आणि उमेदवारीवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महाविकास आघाडीमध्ये (मविआ) फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर बुधवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अनपेक्षितपणे अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटले असून समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे.
या पार्श्वभूमीवर सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शितल म्हात्रे, गुलाबराव पाटील यांसह अनेक नेते उपस्थित होते. उमेदवारीवर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.
दरम्यान, रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची 'वर्षा' या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. ही भेट उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. वडेट्टीवार यांच्याकडे सध्या कोणतेही पक्षपद नसले तरी त्यांच्या भेटीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
याआधी वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत, "उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. जर ही जागा शिवसेना लढवत असेल, तर या निवडणुकांमध्ये आम्ही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यांनी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचे संकेतही दिले.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी दानवे हेच मविआचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. "वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. काही गैरसमज असतील तर ते दूर होतील," असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
याचदरम्यान अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'नंदनवन' निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चाना अधिकच उधाण आले आहे. ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी तिचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या टप्प्यात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही तासांत या सर्व चर्चाना स्पष्ट दिशा मिळणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.