ऑन ड्यूटी नशेत धिंगाणा; दोघे पोलीस तडकाफडकी निलंबित
पुणे : खरा पंचनामा
कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत वावरणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस हवालदारांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एकाने भरती प्रक्रियेसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन करून धिंगाणा घातला.
, दुसऱ्याने थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच नशेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडवले. या दोन्ही हवालदारांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पहिली घटना २१ मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात घडली. पुणे शहर पोलीस भरती २०२४-२५ ची लेखी परीक्षा सुरू असताना हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती इमारत क्रमांक १ मधील सेक्टर एकच्या बंदोबस्तासाठी करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या बंदोबस्ताची अचानक पाहणी केली. त्यावेळी जाधव हे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळले. संशय आल्याने त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी मद्यार्क सेवन केल्याचे निष्पन्न झाले. एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेत अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन केल्याने प्रशासनाने त्यांची गंभीर दखल घेतली.
तर, दुसरी घटना ९ मार्च रोजी घडली. ज्यामध्ये हवालदार संजय कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली. उंड्री पोलीस चौकीत ड्युटी अंमलदार म्हणून कार्यरत असताना कराड दुपारी दोन वाजता आपले कर्तव्य सोडून दुचाकीवरून काळेपडळ पोलीस ठाण्याच्या आवारात आले. यावेळी मद्याच्या नशेत त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी पोलीस ठाण्यातील बाकड्यावर बसलेल्या एका महिला तक्रारदाराला धडक दिली. या धडकेत महिला किरकोळ जखमी झाली. त्यानंतरही शुद्धीवर नसलेल्या कराड यांनी तेथील लोकांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. वैद्यकीय अहवालात कराड यांनीही मद्यार्क सेवन केल्याचे सिद्ध झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कृत्य 'महाराष्ट्र नागरी सेवेचे (वर्तणूक) उल्लंघन करणारे आहे. त्यानुसार दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.