अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या पाचव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजेरी
नाशिक : खरा पंचनामा
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्याने आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली असून, उद्या त्याला पुन्हा पाचव्या गुन्ह्यात हजर केले जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सुरुवातीला न्यायाधीशांनी त्याचे नाव विचारून ओळख पटवून घेतली. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहून चौथ्या गुन्ह्यातील तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. मागील पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत खरातची कसून चौकशी करण्यात आली असून, त्याच्या मालमत्तांची 'ईडी' (ED) मार्फतही तपासणी करण्यात आली आहे.
चौथ्या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्याने पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली. त्याचवेळी, अशोक खरातवर दाखल असलेल्या पाचव्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे विनंती केली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) दाखल केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या पुन्हा खरातला पाचव्या गुन्ह्याअंतर्गत न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी 'एसआयटी' (SIT) त्याला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. खरातवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल असल्याने प्रत्येक गुन्ह्यात सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून ही 'वर्ग' करण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.