नाशिकच्या 'गजवा ए हिंद' प्रकरणात हलगर्जी; महिला तपास अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचा लैगिंक छळ व धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच, असाच काहीसा एक दुसरा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये एका अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसोबत घडला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल असून संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी तंजिर इनामदारची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात संशयित आरोपी व पीडित तरुणी शिक्षण घेत होती. सुरुवातीला तरुणीला संशयिताने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर जबरदस्तीने दारू पाजून व सिगरेट प्यायला सांगून ती नशेत असताना तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. एवढच नाही तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. संशयित आरोपीने तरुणीला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे 'गजवा-ए-हिंद'चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला.
संशयिताने पीडित तरुणीची धार्मिक ओळखीवरच घाव घातला. तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा त्याने तोडून टाकला. तिच्या शरीरावर त्याने चावा घेत हे 'लव्ह बाईट' असल्याचे सांगत तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला वारंवार लॉजवर नेले आणि बळजबरीने शारीरिक अत्याचार केले.
या गुन्ह्याचा तपास पंचवटीच्या पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु या अतिसंवेदनशील प्रकरणात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत तपासी अधिकारी महिला पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांची तडकाफडकी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
याप्रकरणाचा तपास करताना ज्योती आमणे यांनी पीडित तरुणीला चौकशीदरम्यान आक्षेपार्ह प्रश्न विचारले. पीडित तरुणीने त्यासंदर्भात तक्रार केली असता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचवटीच्या सहायक आयुक्तांनी पीडितेचा लेखी जबाब नोंदवून घेतला. त्यात गंभीर बाबी निदर्शनास आल्याने आयुक्तांनी महिला पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांच्याकडील तपास काढून घेत त्यांची आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली केली. या गुन्ह्यात तपास पोलिस आयुक्तांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.