Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'या' विधानसभेतील EVM ची होणार तपासणी

'या' विधानसभेतील EVM ची होणार तपासणी

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात गेल्या वर्षभरापासून ईव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले, तर महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या तीन महिन्यांतच झालेल्या म्हणजेच 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णतः उलटा लागला. कारण, विधानसभेत महायुतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले. परंतु, केवळ तीन महिन्यांतच वारे कसे फिरले? लोकांनी महायुतीला बहुमत कसे दिले? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये गोलमाल केल्याचा आरोप केला.

महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेसचे मुंबईतील नेते नसीम खान यांनी त्यांच्या विरोधातील शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार यांच्या निकालाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करत शिंदेंच्या आमदाराला म्हणजेच चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांना मोठा धक्का दिला आहे. चांदिवली विधानसभेचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मत व्यक्त करताना काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले की, भारताच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही की, निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत EVM ची तपासणी किंवा तपासणी मोहीम राबवली असेल. "हा एक ऐतिहासिक आदेश आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024 मधील निकालाचा संदर्भ दिला. याबाबत ते म्हणाले की, या निकालानुसार, निकालांच्या घोषणेनंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 5 टक्के ईव्हीएममधील म्हणजेच कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT मधील 'बर्न झालेली मेमरी' किंवा मायक्रोकंट्रोलरची तपासणी व पडताळणी ईव्हीएम उत्पादकांच्या अभियंत्यांच्या एका पथकाद्वारे केली जाईल.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, EVM उत्पादक कंपनी असलेल्या 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू' यांच्यामार्फत 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत केवळ 'निदान चाचणी' करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या तब्बल वर्षानंतर ईव्हीएमची तपासणी करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमध्ये ईव्हीएम आणि 'व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल' अर्थात व्हीव्हीपॅट युनिट्सची पडताळणी करून घेण्यास सांगितले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीतील सुमारे दोन डझन उमेदवारांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.