राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. मंगळवारी 26 मे ला गृहविभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत. या अधिकाऱ्यांना नव्याने पोस्टिंग देण्यात आली आहे.
या फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली. तर काही प्रतीक्षाधीन अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात बदलीच्या प्रतिक्षेत असलेले अरविंद चावरिया यांची मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील (SPS) वरिष्ठ अधिकाऱ्याचीही बदली केली आहे. श्रीमती भागीरथी भरत पवार यांची 'सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर' या पदावरून 'पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर' या पदावर प्रशासकीय कारणास्तव तत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली.
तर श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलात पोलीस उपमहानिरीक्षक असलेल्या विनिता साहू यांची नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यासह नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांची मुंबईच्या दशहतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची मुंबई शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
यात ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांची नवी मुंबई येथे झालेली बदली रद्द करुन त्यांना पुन्हा ठाणे शहरमध्ये नियुक्त करण्यात आले. पुण्याचे पीएमआरडीएचे पोलीस अधिक्षक अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील बदली रद्द करुन पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.