Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षक आणि पालक दोघांना अटक

नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षक आणि पालक दोघांना अटक

पुणे : खरा पंचनामा 

सीबीआयने नीट प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एक शिक्षक आणि एक पालक अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांपैकी एकाचा मनिषा हवालदार आणि दुसऱ्याचा मोटेगावकरांशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

या अटकेमुळे मोठे धागेदोरे हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अजून कोण कोण आहे? याची कसून चौकशी या दोघांकडून केली जाणार असून पेपरफुटीत या दोघांचा किती सहभाग होता याचाही तपास केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सीबीआयने पुण्यातून तेजस शाह नावाच्या फिजीक्सच्या शिक्षकाला अटक केली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने नंबर सेव्ह होता. शिवाय मनिषा हवालदारकडून त्याने पेपर घेतल्याची माहिती आहे. तो मनिषा हवालदारच्या संपर्कात होता. त्यामुळेच सीबीआयने त्याला अटक केली असून आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. टेलिग्राम ग्रुपमध्येही तो होता का? याचीही माहिती घेतली जाणार आहे. तसेच पेपर फोडल्यानंतर त्याने त्यातून आर्थिक कमाई केली का? याचाही शोध घेण्यात येणार आहे. त्याचं बँक अकाऊंटही तपासलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, सीबीआयने डॉ. मनोज शिरूरे यालाही अटक केली आहे. त्याचा मोटेगावकराशी थेट संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर मध्ये सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरूच आहे. नव्याने दोन विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. आता पर्यंत पाच डॉक्टर आणि चार विद्यार्थी, पालकांची चौकशी करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाशी धागेदोरे कसून तपासले जात आहेत.

नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याची कबुली शिवराज मोटेगावकर याने सीबीायला दिल्याची माहिती आहे. सीबीआयच्या चौकशीत मोटेगावकरने त्याच्या मुलाला नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याची कबुली दिल्याची माहिती कळते आहे. सीबीआयने अधिकृतरित्या ही माहिती दिलेली नसली तरी मोटेगावकर याने मुलाला डॉक्टर करण्यासाठी पेपर विकत घेतल्याचे समोर आले आहे. मोटेगावकरला 10 दिवसांची पोलिस कोठडी मिळालेली होती. या दरम्यान झालेल्या चौकशीत मोटेगावकरने नीट परीक्षेच्या अगोदरच पेपर मिळाल्याचे कबूल केले असल्याचे कळते आहे.

दरम्यान, लातूर महानगर पालिकेने मोटेगावकरला दिलेला बांधकाम परवाना वादात सापडला आहे. औद्योगिक सहकारी संस्थेची जागा मोटेगावकरच्या नावावर नसताना देखील बांधकाम परवाना दिला गेल्याचे समोर आले आहे. त्यावर आता आमदार अमित देशमुख यांनी मनपा कठोर कार्यवाही करेल अस म्हटले आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच लातूर महानगर पालिकेत कारभार केला जाईल. कायदा बाहेर जाऊन कोणी काम करीत असेल तर त्याच्यावर कार्यवाही होईल अस अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते लातूर इथं माध्यमांशी बोलत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.