दुकानदाराला फसवून दागिने लंपास करणाऱ्या इराणी टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक
3.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
ईश्वरपूर येथील एका दुकानदारास बोलत ठेवून त्याला फसवून चेन आणि अंगठी लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. आंतरराज्य इराणी टोळीचा तो सदस्य आहे. त्याच्याकडून सोन्याची चेन, अंगठी, दुचाकी असा 3.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
इक्बाल हिम्मतलाल बेग (वय ५९, रा. कुडची ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ईश्वरपूर येथे आनंदा वडगावकर हे त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी दोन तरुण त्यांच्या दुकानात आले. वडगावकर यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा घेत त्यांना बोलत ठेवून त्यांच्या गळ्यातील चेन, अंगठी चलाखीने लंपास केली होती. याबाबत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील चोरट्याना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक झाडे यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना कर्नाटकातील गुन्हेगार सांगलीवाडी येथील बायपास रस्त्यावर फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन बेग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने ईश्वरपूर येथील चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून चेन, अंगठी, दुचाकी जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, सागर लवटे, अरुण पाटील, संदीप गुरव, उदय माळी, सागर टिंगरे, सतिश माने, अमिर फकीर, संदीप नलावडे, मोतीराम खोत, सुरज थोरात, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.