मोलकरणीच्या 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील वरळी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात वरळी पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित 9 वर्षांची मुलगी वरळी येथील एका सार्वजनिक बागेत खेळत होती. यादरम्या आरोपी एसीपी मुलीसमोर गेला आणि तिला अश्लील कृत्य केले. तसेच तिला आपल्या खासगी अवयवांना स्पर्श करण्यास भाग पाडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तिथून पळ काढला. घरी जाऊन मुलीने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला.
पीडितेची आई घरकाम करते. तिने तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पथक पाठवून संशयिताची ओळख पटवली. प्राथमिक चौकशी आणि संशयिताची ओळख पटल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, आणखी एका अल्पवयीन मुलाने पोलिसांशी संपर्क साधत आपल्यासोबतही आरोपीने अशा प्रकारचे अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. याबाबत पोलीस स्वतंत्र चौकशी करत आहेत.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 74 आणि 79 अंतर्गत, तसेच 'POCSO' कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अधिकारी मूळचा नागपूरचा असून नोव्हेंबर 2025 पासून तो मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यरत होता. या घटनेमुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्य वर्तणुकीवर आणि शिस्तीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत असून, वरळी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.