राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये : प्रवीण पाटील
लघुलेखक पदे मृत घोषित करण्याच्या जीआर विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सांगली : खरा पंचनामा
राज्य सरकारने 5 मे 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार लघुलेखकची सर्व पदे मृत घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली लघुलेखक अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांगलीचे पालकमंत्री तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी प्रवीण पाटील म्हणाले, “राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. आठ ते दहा वर्षांपासून स्टेनोचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अचानक पद मृत घोषित करण्याचा अन्यायकारक निर्णय लादण्यात आला आहे. हे तरुण-तरुणी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.” ते पुढे म्हणाले की, “मराठा क्रांती मोर्चा जात-पात आणि धर्म न पाहता या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.”
विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आश्वासन दिले की, “तुमच्या मागणीचा योग्य तो विचार करून शासन योग्य निर्णय घेईल.”
या भेटीवेळी लघुलेखक अभ्यास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.