पिस्तूल बाळगल्याबद्दल सांगलीत एकास दोन वर्षांची शिक्षा, दंड
सांगली : खरा पंचनामा
विनापरवाना परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याबद्दल संजय यशवंत लोंढे ( वय ३४ रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली ) याला २ वर्ष साधा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ओंकार संजय शास्त्री यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मनोज बागल यांनी काम पाहिले.
दिनांक ६ मार्च २०१५ रोजी तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हवालदार विशाल भिसे व त्यांचे पथक टिंबर एरिया परिसरात रात्रीची गस्त घालत होते. शिंदे मळा येथील रेल्वे पुलाखाली संजय लोंढे हा संशयितरित्या फिरताना या पथकाला दिसला. संजय लोंढे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडे यापूर्वी अग्निशस्त्र असल्याचे पोलिसांना कल्पना होती. म्हणून त्यांनी संजय लोंढे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सांगितले की माझ्याकडे अग्निशस्त्र नाही परंतु मी माझ्या घरामध्ये परदेशी बनावटीचे पिस्तूल ठेवले आहे.
त्यानंतर या पथकाने त्याला त्याच्या घरी नेले असता त्याने पंचा समक्ष त्याच्या घरातील ते पिस्तूल काढून पोलिसांना दिले. याप्रकरणी विशाल भिसे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड यांनी तपास करून संजय लोंढे विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सहाय्यक फौजदार लैला मुलाणी यांनी सरकार पक्षाला मदत केली.
न्यायालयामध्ये लोंढे याच्यावरील भारतीय शस्त्र कायदा कलम ३ व २५ चा आरोप शाबीत झाला. दंड न भरल्यास एक महिना जादा साध्या कैदेची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.