कोसारी येथील दुहेरी खुनातील साक्षीदाराचेच अपहरण : कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना
जबाबासाठी फिर्यादीसोबत जाण्यापूर्वीच नेले पळवून
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खुनातील साक्षीदाराचेच अपहरण करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी कवठेमहंकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे ही घटना घडली. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादासो नामदेव यमगर (वय 50, रा. कोसारी ता. जत) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रविण विलास यमगर (वय 22, रा. कोसारी) याने फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान हाक्के पेट्रोलपंप ते नागज फाटा दरम्यान अपहरणाची घटना घडली. फिर्यादी प्रवीण याचे चुलते दादासो यमगर हे गाडीत पेट्रोल टाकुन येतो असे सांगुन गेले नंतर त्यांची दुचाकी (MH 13 AU 6654) ही अनोळखी व्यक्ती चालवुन घेवुन गेला आहे. तसेच दादासो यमगर यांचा मोबाईल बंद लागत असलेने कोणीतरी अनोळखी इसमाने कोणत्यातरी कारणासाठी फिर्यादीचे चुलते दादासो यमगर यांचे अपहरण केले आहे, असे फिर्यादित म्हटले आहे.
जत तालुक्यातील कोसारी येथे जुलै 2023 मध्ये विहरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विलास आणि प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आणि तिचा मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहेत. या खून प्रकरणात प्रवीण यमगर फिर्यादी असून दादासो यमगर साक्षीदार आहेत. मंगळवारी प्रवीण जबाबासाठी जाणार होता त्याच्यासोबत दादासो यमगरही जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एलसीबी आणि कवठेमहंकाळ पोलिसांची पथके संशयितांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.