Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २७ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

मिरजेत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २७ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद 
महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 

पूजा फडके 
​मिरज : खरा पंचनामा 

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून रोख रक्कम चोरणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २७ गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा समावेश असून, त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

​नेमकी घटना काय? 
​कृष्णाघाट, मिरज येथील रहिवासी कुदरत कादर मुलाणी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी कपाटातील ५०,००० रुपये आणि फिर्यादीच्या खिशातील ५,००० रुपये अशी एकूण ५५,००० रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. ही घटना १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री घडली होती.

​अशी झाली कारवाई 
​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (भाटी) हा आपल्या दोन साथीदारांसह सांगलीतील हरीपूर रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. ​महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने सापळा रचून  किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (भाटी) ( रा. गडमुडशिंगी, कोल्हापूर), ऋतुराज सुभाष गजेश्वर (रा. हरीपूर रोड, सांगली), समर्थ शंकर डवरी (रा. हरीपूर रोड, सांगली) यांना ताब्यात घेतले.

​अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी किसन उर्फ बोबड्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटक राज्यात मालमत्तेविरुद्धचे सुमारे २७ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याला महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या काळातही त्याने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. ​न्यायालयाने आरोपींना ५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अभिजीत धनगर, शंकर गायकवाड, नानासाहेच चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रामकृष्ण सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.