Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य शासनाने पेट्रोल - डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करा!जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सल्ला

राज्य शासनाने पेट्रोल - डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करा!
जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सल्ला

मुंबई : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत. अशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मोठा सल्ला दिला आहे. कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल - डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे अशी भावना जयंत पाटील यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. "राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे 25 टक्के + व्हॅट 10.12 रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. तर डिझेलवर अंदाजे 24 टक्के व्हॅट + 3 रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज 111 रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट 70-80 रुपयात मिळू शकते. असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आपण या सुचनेचा सकारात्मक विचार कराल आणि तत्काळ पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा करतो." असेही ते म्हणाले.

"आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोलडिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे.

आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत आहे. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे." असे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.