चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब !
इंधन टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत
मुंबई : खरा पंचनामा
इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं असून त्याची झळ आता भारतातही तीव्रपणे जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चार वेळा वाढ करण्यात आली असून देशात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा फटका बसत आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांना इंधनाची गरज वाढली असताना ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. इंधनाचा पुरवठा कमी झाल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, इंधन टंचाईची झळ आता थेट मुंबईपर्यंत पोहोचली आहे. राजधानी मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने ते तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सायन परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी फक्त सीएनजी सेवा सुरू असून त्यासाठीही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
परळ परिसरातील काही पेट्रोल पंपांवरही इंधन संपल्याचं चित्र दिसत आहे. सायनमधील पेट्रोल पंपांवर सकाळपासून पेट्रोल, डिझेल आणि पॉवर पेट्रोल उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पंपावरील कर्मचारीही रिकामे बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाढत्या इंधन संकटामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.