विनापरवाना पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसांसह ईश्वरपूरच्या तरुणाला अटक 
सांगली एलसीबीची कारवाई

सांगली : खरा पंचनामा 

सांगली एलसीबीच्या पथकाने ईश्वरपूर येथे केलेल्या कारवाईत बेकायदेशीररीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना दिले होते. या आदेशानुसार, सहायक निरीक्षक लहू थाटे आणि त्यांचे पथक ईश्वरपूर शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील अरुण पाटील यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. माहितीनुसार, एक तरुण उदय चौकात कंबरेला शस्त्र खोचून उभा होता. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्याला जागीच घेरून ताब्यात घेतले.

पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव  अबुबकर हरुणरशीद मणेर (वय २६, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपुर, ता. वाळवा) असे आहे. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. शस्त्राबाबत विचारपूस केली असता, हे पिस्तूल त्याने ईश्वरपूर येथील साबीर पुणेकर नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध ही विशेष मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लहू थाटे, अरुण पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, उदय माळी, सुरज थोरात, विक्रम खोत, विनायक सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.