Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर गाडी थांबवली : ९५ जणांवर कारवाई

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर गाडी थांबवली : ९५ जणांवर कारवाई

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील जगातील सर्वात रुंद बोगद्याची आणि देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पुलाची प्रवासी-वाहनचालकांना पडलेली भूरळ काही कमी होताना दिसत नाही.

पुलावर आणि बोगद्यात गाड्या थांबविणाऱ्यांविरोधात महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. असे असतानाही मिसिंग लिंकवर वाहने थांबणे काही बंद झालेले नाही. त्यामुळेच तीन दिवसांत महामार्ग पोलिसांनी एकूण ९५ वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई केली. तर ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १३.३ किमीची खोपोली- कुसगाव अशी नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधली. या नवीन मार्गिकेचे लोकार्पण शुक्रवारी झाले. लोकार्पणानंतर तात्काळ मुंबई-पुणे वाहिनी सुरू करण्यात आली, तर शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून पुणे - मुंबई वाहिनी सेवेत दाखल झाली. मिसिंग लिंकमुळे मुंबई - पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी झाला, पण त्याचवेळी हा प्रकल्प अभियांत्रिकी चमत्कार (इंजिनीअरिंग मार्व्हल) मानला जात आहे. कारण दऱ्याखोऱ्यांत, डोंगरातून, तलावाखालून ही मार्गिका जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पातील दोन बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले असून त्याची नोंद गिनीज बुकात झाली आहे. तर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पुलही याच प्रकल्पात उभारला आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण असून या प्रकल्पाची नोंद लिम्का बुकमध्ये करण्याच्या दृष्टीनेही प्रक्रिया सुरू आहे. आता एमएसआरडीसीने लिम्का बुकमध्ये या प्रकल्पाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पाची भूरळ नागरिकांना पडणार हे साहजिकच आणि त्यातूनच या मार्गिकेवरून प्रवास करताना अनेकांना बोगद्यात, पुलावर छायाचित्रे घेण्याची, चित्रफित तयार करण्याचा मोह आवरताना दिसत नाही. मात्र असे करणे वाहतूक नियमांचे उल्लंघन असून स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यात आणणे आहे. त्यामुळेच आता महामार्ग पोलिसांनी अशा वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मिसिंग लिंकवर शनिवारपासून थांबणाऱ्या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. शनिवारी १५ वाहनांविरोधात, रविवारी ५१ वाहनांविरोधात, तर सोमवारी ३१ वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आतापर्यंत ५०० रुपयांप्रमाणे ४७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे. दरम्यान, एमएसआरडीसीकडून मिसिंग लिंकवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास अशा वाहनांवर प्रत्यक्ष स्थळी कारवाई करावी लागणार नाही. त्यांना ई-चलान जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारांना आपोआप आळा बसेल, असे म्हटले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.