आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार... थरारक पाठलाग
पुणे : खरा पंचनामा
पुण्याच्या रांजणगाव गणपती येथे पोलिस आणि फरार आरोपींमध्ये थरारक पाठलाग आणि कथित गोळीबाराची घटना घडल्याने रांजणगाव गणपती परिसरात एकच खळबळ उडाली.
चऱ्होली गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे विशेष पथक शिरूर तालुक्यात दाखल झाले होते. आरोपी सोनेसांगवी येथील शेळके वस्ती परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात काही काळ पोलिस आणि आरोपींमध्ये थरारक पाठलाग रंगला.
दरम्यान आरोपींची दुचाकी बंद पडल्याने त्यांनी वाहन रस्त्यातच सोडून दिले आणि अंधाराचा तसेच उसाच्या शेतांचा फायदा घेत पिंपरी दुमाला-वाघाळे परिसराच्या दिशेने पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपींकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची चर्चा असून त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत काही राऊंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेबाबत पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली होती उसाच्या शेतांमध्ये आणि वस्तीभागात रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू होते. फरार आरोपींपैकी शेखर संभाजी जाधव या संशयिताचे नाव चर्चेत असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे सोनेसांगवी, पिंपरी दुमाला आणि वाघाळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्रीपर्यंत पोलिसांच्या वाहनांची धावपळ आणि सर्च ऑपरेशन सुरू असल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. तर परिसरातील आरोपींना कायमचा धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.