नसरापूरमधील अत्याचार अन् खून प्रकरणी आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : खरा पंचनामा
भोर तालुक्यात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले.
त्यानंतर या प्रकरणातील आरोपीला राजगड पोलिसांनी बंदोबस्तात शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी हजर केले. संभाव्य अनुचित घटना घडण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणातील खून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.
'या प्रकरणात आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. रासायनिक विश्लेषण तपासणी, तसेच लैगिंक सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केले आहेत का? तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करायचा आहे. बालिकेला घेऊन जाताना आरोपीला साक्षीदारांनी पाहिले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहे. आरोपीने बालिकेचा खून करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले आहे? यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपीला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का? यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याात यावी', अशी विनंती विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करताना पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात दुपारी आरोपीला हजर करण्यात आले. तेव्हा एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसंची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.