Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

४ गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!विटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

४ गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!
विटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने विटा ते तासगाव रोडवर धाडसी कारवाई करत एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४ देशी बनावटीचे पिस्तुल (पिस्टल), ४ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण २ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

धिरज सतीश चव्हाण (वय २१, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक विटा परिसरात गस्तीवर होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. विटा ते तासगाव रोडवरील 'श्री मंगल कार्यालय' परिसरात एक तरुण पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे बातमीदाराने सांगितले.
माहिती मिळताच पोलिसांनी श्री मंगल कार्यालय परिसरात सापळा रचला. तिथे मोटारसायकलजवळ पाठीवर सॅक अडकवून थांबलेला एक संशयित तरुण पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपी धिरज चव्हाण याच्या पाठीवरील सॅकमध्ये ४ देशी बनावटीचे पिस्तुल आणि पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे (राऊंड) आढळून आले. सदर शस्त्रांबाबत अधिकृत परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता.

मध्य प्रदेशातून आणली होती शस्त्रे
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील 'पाजी' (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीकडून ही शस्त्रे खरेदी केली असून, सांगली भागात ती जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली त्याने दिली आहे. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर अशीच प्रभावी कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, अभिजीत ठाणेकर, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सतीश अलदर व विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.