पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई !
पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी
वाशीम : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः परभणी, बुलढाणा, वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे बोर्ड लावण्यात आले असून काही ठिकाणी इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधनटंचाईचे संकट गडद झाले आहे. मुख्य डेपोमधून वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहेत. ज्या काही पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहनचालकांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याची तक्रार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून इंधन उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूप थेट मारहाणीत बदलले. काही दुचाकीस्वारांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
वाशीम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा इतका वाढला आहे की, टँकर पोहोचताच पेट्रोल पंपांवर अक्षरशः झुंबड उडत आहे. एका पेट्रोल पंपावर रांगेतून पुढे जाण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंप परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नंदूरबार जिल्ह्यातही पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. विशेष म्हणजे गुजरात सीमेजवळ असल्याने तिकडील वाहनचालकही नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक पुरवठ्यावर अधिक ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी आधी 'डिझेल संपले' असे फलक लावण्यात आले आणि दरवाढ लागू झाल्यानंतर अचानक इंधन विक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून नफेखोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.