Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

NEET पेपरफुटीचे धागे नांदेडपर्यंत CBI कडून एका कुटुंबाची चौकशी

NEET पेपरफुटीचे धागे नांदेडपर्यंत 
CBI कडून एका कुटुंबाची चौकशी

नांदेड : खरा पंचनामा 

देशभरात गाजत असलेल्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातील नांदेड शहरात उमटताना दिसत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नांदेडमधील विद्युतनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची सखोल चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल आठ ते नऊ तास सुरू असलेल्या या चौकशीमुळे प्रकरणात नवीन धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबातील विद्यार्थिनीने याआधी दोन ते तीन वेळा NEET परीक्षा दिली होती. मात्र, तिचे गुण नेहमीच मर्यादित राहिले होते. यंदाच्या परीक्षेत मात्र तिच्या गुणांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यात काही दिवस विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थिनीचा स्कोअर थेट 560 पेक्षा अधिक गेल्याने CBI च्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे.

या प्रकरणात संबंधित कुटुंबाने लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे पाच लाख रुपयांच्या व्यवहारातून पेपर मिळवण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे. तथापि, अद्याप कोणालाही अधिकृतरीत्या अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरू आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरच या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. CBI कडून आता या संपूर्ण रॅकेटची साखळी उघड करण्यासाठी वेगाने तपास सुरू असून, आगामी काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.