जगभरातील इंटरनेट ठप्प होणार?
टोल आकारण्याचा इराणचा इशारा
दिल्ली : वृत्तसंस्था
आखाती युद्धामुळे जगातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम तेलाच्या किमतींपासून महागाईपर्यंत सर्वच गोष्टींवर होत आहे. आता या युद्धामुळे जागतिक इंटरनेट सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे युद्ध आता केवळ दोन देशांमधील युद्ध राहिले नसून जगासाठी एक आव्हान बनले आहे.
या दोन देशांच्या युद्धात होर्मुझची सामुद्रधुनी सर्वाधिक चर्चेत आहे. इराण आता होर्मुझ सामुद्रधुनीखालून जाणाऱ्या केबल्सवर टोल आकारण्याची तयारी करत आहे. जगातील बहुतेक डेटा याच सागरी मार्गातून प्रवास करतो. तसेच याच मार्गात जगातील इंटरनेट सेवांच्या केबल्सचे मोठे जाळे आहे. इराणच्या या नव्या इशाऱ्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
इराणचे लष्करी प्रवक्ते, इब्राहिम झोल्फघारी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, आम्ही इंटरनेट केबल्सवर शुल्क आकारू, याचा अर्थ कंपन्यांना समुद्राखालील इंटरनेट केबल्स वापरण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात. जगातील इंटरनेटचा मोठा भाग या केबल्सद्वारे चालतो.
जमिनीवर दिसणारे इंटरनेट प्रत्यक्षात समुद्राखाली टाकलेल्या फायबर केबल्समधून जाते, जे एका देशाला दुसऱ्या देशाशी जोडते. त्यामुळे याचे इंटरने सेवांसाठी याचे महत्त्व सर्वाधिक आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीखाली इंटरनेट केबल्सचे एक मोठे जाळे अस्तित्वात आहे. हा परिसर केवळ तेलासाठीच नव्हे, तर इंटरनेटसाठीही महत्त्वाचा आहे. या प्रदेशातून अनेक प्रमुख केबल्स जातात, ज्या आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडतात. याचा अर्थ असा की, जर येथे काही समस्या निर्माण झाली, तर त्याचा परिणाम एकाच वेळी अनेक देशांवर होऊ शकतो. भारतातही इंटरनेट सेवा खंडित होऊ शकतात.
FALCON, GBICS, 2Africa, SeaMeWe 6 आणि AAE 1 सारख्या प्रमुख केबल्ससह अनेक मोठ्या केबल्स या भागातून जातात. या केबल्स आशिया, आफ्रिका आणि युरोप दरम्यान इंटरनेट ट्रॅफिक हाताळतात. याचा अर्थ असा की, जगाचा एक मोठा भाग या मार्गाने जोडलेला आहे. भारतासाठी हा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे कारण यापैकी अनेक केबल्स थेट भारतात येतात आणि मुंबई व चेन्नईमध्ये जोडल्या जातात. या केबल्स भारताला आखाती देश, युरोप आणि आफ्रिकेशी जोडतात.
देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या, जसे की एअरटेल आणि जिओ, देखील या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे, या नेटवर्कमध्ये कोणताही व्यत्यय आल्यास, शुल्कवाढ झाल्यास किंवा केबलचे नुकसान झाल्यास, त्याचा थेट परिणाम देशातील लोकांवर होईल.
आजच्या काळात इंटरनेट फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित राहिलेले नाही. बँकिंग, यूपीआय पेमेंट्स, ऑफिसचे काम, ऑनलाइन शिक्षण, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि कॉर्पोरेट डेटा हे सर्व त्यावर अवलंबून आहे. इंटरनेट धीमे, महाग किंवा तात्पुरते बंद झाल्यास, त्याचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. शिवाय, केबलमध्ये बिघाड झाल्यास, दुरुस्तीसाठी बराच वेळ लागू शकतो, कारण पाण्याखाली काम करणे कठीण असते. त्यामुळे धोका फक्त युद्धापुरता मर्यादित नाही. इंटरनेट आता एक प्रमुख घटक बनले आहे. भविष्यात परिस्थिती आणखी बिघडल्यास, इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.