१३२ प्रश्नांची पीडीएफ, मोटेगावकरकडे NEET चा पेपर आला कुठून?
सीबीआयच्या चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट
पुणे : खरा पंचनामा
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून चौकशीचा फास अधिक घट्ट होत आहे. सीबीआयने सुरू केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे म्हटले जात आहे.
'आरसीसी' क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडे प्रश्नपत्रिकेची पीडीएफ सापडली. पण त्याच्याकडे प्रश्नपत्रिका आली कुठून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिवराज मोटेगावकरने आपल्या क्लासेसमधील मुलांना गेस पेपर सोडवण्यास दिले होते. या गेस पेपरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचा आरोप आहे. मोटेगावकरने हाताने प्रश्नपत्रिका लिहून मुलांना दिली होती. तेच प्रश्न 'नीट' परीक्षेत विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या काही दिवस आधी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी मोटेगावकरांनी आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांची एक विशेष 'मॉक टेस्ट' (सराव परीक्षा) घेतली होती. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली तब्बल ६० पानांची एक पीडीएफ (PDF) पाठवली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या हस्तलिखित प्रश्नपेढीतील तब्बल १३५ प्रश्न मुख्य नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते. कोणत्याही डिजिटल फॉरमॅटचा वापर न करता, केवळ स्वतःच्या हाताने लिहून मोटेगावकरांनी पेपर फोडल्याचा संशय सीबीआयला आहे.
सीबीआयकडून या प्रकरणाचा तपासात एक मोठी माहिती निष्पन्न झाली आहे. परीक्षेतील रसायनशास्त्राच्या पेपरचे मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी प्रल्हाद कुलकर्णी याच्यावर होती. कुलकर्णीकडे रसायनशास्त्राच्या ४५ प्रश्नांच्या चारपैकी तीन संचांचे भाषांतर करण्याचे काम देण्यात आले होते. कुलकर्णीने या तीन संचांमधील १३५ पैकी तब्बल १३२ प्रश्न 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस'चा संचालक शिवराज मोटेगावकर याला पुरवले असल्याचे तपासात आले.
प्रल्हाद कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकरचा शिक्षक असून, या दोघांमध्ये पूर्वीपासूनच अत्यंत जवळचे संबंध होते. कुलकर्णीकडे प्रश्नपत्रिकेचे भाषांतर करण्याची जबाबदारी आल्यानंतर, त्याने हे प्रश्न मोटेगावकरला सांगितले. कुलकर्णीने सांगितलेले प्रश्न मोटेगावकरने लिहून घेतले आणि त्याची एक 'पीडीएफ' (PDF) तयार करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केली.
लातूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या १३२ प्रश्नांची 'पीडीएफ' सापडली होती. मात्र, हे प्रश्न त्याच्याकडे नेमके कुठून आले, याचा उलगडा सीबीआयच्या चौकशीत आता झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.