नाशिक TCS प्रकरण : शिरखुर्मा अन् शीतपेयातून दिलं गुंगीचं औषध; नंतर महिलांवर केले अत्याचार
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत झालेले हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न यासह अन्य गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना शनिवारी (दि. २) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. सहाव्या गुन्ह्यात तिसऱ्यांदा त्यांचा ताबा घेण्यात आला आहे.
एसआयटी पथकाच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वरील संशयित आरोपींनी पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना शिरखुर्मा आणि शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ मिसळून पिण्यासाठी दिले होते. या गुंगीकारक पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या हिंदू कर्मचारी महिला व मुलींवर संशयितांनी लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या महिलांचे ब्रेन वॉश करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात होते.
कोर्टात सुनावणीवेळी सरकारी पक्षाचे वकिल अजय मिसर यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला व संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यांनी याप्रकरणात प्रभावी मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यामध्ये, संशयितांनी पीडित महिलांना शिरखुर्मा आणि शीतपेयातून नेमके कोणते गुंगीकारक पदार्थ दिले? गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप, गॅझेट्स जप्त करुन त्याचा सर्व हिस्ट्रीचे आणि सोशल मीडिया अकाऊंटचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे. तसेच धर्मांतरकरिता या टोळीला बाहेरील शक्तीकडून फंडिग झाले होते काय? याचा तपास करण्यासाठी संशयितांच्या बँक स्टेटमेंटची तपासणी करायची आहे. पीडितेच्या कौटुंबिक अडचणींचा गैरफायदा घेऊन तिला करणी बाधा अथवा ब्लॅक मॅजिकबद्दल माहिती देऊन जाळ्यात ओढल्याचा संशय असून या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.
सरकारी वकिलांच्या युक्तीवादा दरम्यान तपासी अधिकारी कल्पेश दाभाडे यांनी तपासातील महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यानुसार न्यायालयाने निकाल देत संशयितांच्या पोलिस कोठडीत ५ मे पर्यंत वाढ केली. दुसरीकडे, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणातील कंपनीतील प्रोसेस असोसिएट व मुख्य संशयित आरोपी निदा खान हिने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि एसआयटीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला. निदा सध्या फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.