Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विषारी दारू प्रकरण, पोलीसच निघाले 'मौत के सौदागर'? खास कनेक्शन समोर, 4 जणांचं निलंबन

विषारी दारू प्रकरण, पोलीसच निघाले 'मौत के सौदागर'? 
खास कनेक्शन समोर, 4 जणांचं निलंबन

पुणे : खरा पंचनामा 

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १८ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

अद्याप अनेकजण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे विषारी दारुमुळे अनेकांचा तडफडून मृत्यू झाला असताना पोलीस प्रशासनाला मान खाली घालायला लावणारी बातमी समोर आली आहे.

या प्रकरणाचे पडसाद आता पुणे ग्रामीण पोलीस दलात उमटले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत म्होरक्याशी कनेक्शन असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आज हा आदेश जारी केलाय. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दौंड पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित शिवाजी काळे आणि पोलीस शिपाई सुमित नंदकुमार वाघ तर यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप, यांचा समावेश आहे.

विषारी दारू प्रकरणातील आरोपी राधेश्याम प्रजापती हा उरुळी कांचन परिसरातील रहिवासी असून त्याचे या चारही पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं. या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीला बाधक आणि अत्यंत संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

या चौकशी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस नियमांनुसार या चौघांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन निलंबन काळात या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच सकाळ-संध्याकाळ अशी दिवसातून दोन वेळा पोलीस मुख्यालयात हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आलं आहे.

या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणातील चौकशीची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या घटकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचं मानलं जात आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.