भाजपचा पदाधिकारी निघाला सोने तस्कर, 5 कोटींच्या सोन्यासह मुंबई विमानतळावर अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRI ने सोने तस्करीविरोधात एक अत्यंत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हायप्रोफाईल सोने तस्करी प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या पथकाला मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून शनिवारी मध्यरात्री सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरात ही धडक कारवाई केली. संशयास्पद हालचालींवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या झडतीमध्ये ५ कोटींहून अधिक किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींमध्ये अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अजित आचरेकर याने जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर आचरेकर यांच्यावर कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा थेट सोने तस्करीत सहभाग समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
डीआरआयच्या प्राथमिक तपासानुसार, जप्त करण्यात आलेले सोने हे परदेशातून आणले गेले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास आता यंत्रणा करत आहेत. या प्रकरणात अजित आचरेकर याच्यासह इतर ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या तस्करीच्या मागे आणखी कुणी बडे मासे आहेत का? या दिशेने डीआरआयने आपला तपास सुरू केला आहे. एका सोने रॅकेट प्रकरणात अशाप्रकारे भाजपचा पदाधिकारी आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.