Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सचिन घायवळ राजस्थानातून अटकेत

9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सचिन घायवळ राजस्थानातून अटकेत

पुणे : खरा पंचनामा 

मोक्का कारवाईनंतर तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-३ने राजस्थानातून अटक केली आहे. सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

खंडणीच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सचिन घायवळ पुण्यातून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, तो वारंवार ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण जात होते. अखेर तो राजस्थानातील सिकर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.

सचिन घायवळ हा व्यवसायाने शिक्षक असून एका नामांकित शाळेत कार्यरत होता. तो कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. त्याच्याविरोधात कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यांमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ४४ लाख ३६ हजार रुपयांच्या खंडणीप्रकरणात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

कर्वेनगर, वारजे आणि शिवणे परिसरातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीच्या महिला संचालिकेकडून खंडणी उकळल्याचा आरोप सचिन घायवळ, निलेश घायवळ आणि त्यांच्या साथीदारांवर आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन फरार झाला होता.

तपासादरम्यान तो केवळ आवश्यकतेनुसारच मोबाईल सुरू करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. गुन्हे शाखेचे पथक गेल्या चार दिवसांपासून राजस्थानमध्ये तळ ठोकून होते. अखेर दिंगपूर गावातून त्याला अटक करण्यात यश आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट-३चे पोलीस निरीक्षक प्रशांत अणछत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे तसेच पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, मारुती पारधी, अतुल साठे, नितीन जगदाळे, अमोल काटकर, संदीप शेळके, अनुष्का जगदाळे, योगेश झेंडे आणि शुभम वागसकर यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.