Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त व अधीक्षक थेट फिल्डवर; आज एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल!वर्षभरात १६०१ गुन्हे, २ कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगलीत राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त व अधीक्षक थेट फिल्डवर; आज एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल!
वर्षभरात १६०१ गुन्हे, २ कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक आणि ढाब्यांवर चालणाऱ्या बेकायदेशीर मद्यपानाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. वर्ष २०२५-२६ या काळात जिल्ह्यात तब्बल १६०१ गुन्हे नोंदवण्यात आले असून १७०८ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेत २ कोटी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील अवैध ढाब्यांवर बसून मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध एकूण १८४ कारवाया करण्यात आल्या, ज्यामध्ये ३९२ आरोपींवर गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, मागील वर्षी झालेल्या ४ लोकअदालतींमध्ये ३८ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली असून, ढाब्यावर मद्य पिणाऱ्या १०३ आरोपींना न्यायालयाने मोठा दंड ठोठावला आहे. याशिवाय, जिल्ह्यात अवैध ताडी विक्रीचेही ७३ गुन्हे नोंदवून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात सर्वाधिक ३२९ कारवाया करण्यात आल्या. तसेच परराज्यातून येणाऱ्या अवैध मद्याच्या २५ कारवायांमध्ये १ कोटी ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

विभागीय उपआयुक्त व अधीक्षक थेट फिल्डवर; आज एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल!
अवैध दारू धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आज कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक प्रदीप पोटे स्वतः सांगली जिल्ह्यात थेट फिल्डवर उतरले होते. त्यांच्या उपस्थितीत हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर प्रत्यक्ष छापे टाकण्यात आले.

आज गुरुवारी झालेल्या कारवाईचा तपशील:
 एकूण नोंद झालेले गुन्हे : 
 ११ (९ वारस गुन्हे आणि २ बेवारस गुन्हे)
अटक आरोपी:११ जण
जप्त केलेला साठा:
देशी दारू: ३२.७६ ब.ली.
रसायन: ८५० लीटर
गावठी दारू: ३५ ब.ली.
एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹ ५०,४९०/-

विभागीय उपआयुक्तांच्या या थेट कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.