"मी फक्त पोस्टमन, कार्यक्रम कोणाचा करायचा हे ...."
सोलापूर : खरा पंचनामा
राज्यातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १७ पैकी काही जागांवरील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर, उर्वरित जागांवरील निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटील कुटुंबावर नाव न घेता अत्यंत बोचरी आणि आक्रमक टीका केली आहे.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाच्या आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज्याचे मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. जयकुमार गोरे यांनी मोहिते-पाटील कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, "मोहिते-पाटील कुटुंबाने देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या बेईमानीचा बदला घ्यायचा असेल, तर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनाच मतदान झाले पाहिजे," असे थेट आवाहन गोरे यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे सोलापूरची विधान परिषद निवडणूक आता थेट 'जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते-पाटील' अशा हायव्होल्टेज संघर्षात बदलली आहे.
एका जाहीर सभेत बोलताना जयकुमार गोरे यांचा रोख पूर्णपणे मोहिते-पाटलांवर होता. ते म्हणाले," ज्यांचे कुटुंब संपले होते. त्यांना उभे करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्याशी केलेल्या बेईमानीचा बदला घ्यायचा आहे. आता काळ बदलला आहे. आज यांना कोतवालही नमस्कार करत नाही. दिवा विझताना जसा मोठा होतो, तशीच यांची अवस्था झाली आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी विधान परिषदेत उमेदवारी ठेवली आहे आणि वसंत नाना देशमुख यांना केवळ बळीचा बकरा बनवले आहे."
आपल्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण देताना गोरे म्हणाले, "मी जरी बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री असलो, तरी सोलापूर जिल्ह्यात माझे काम फक्त एका 'पोस्टमन'सारखे आहे. जिल्ह्यातील निरोप मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि तिथले निरोप जिल्ह्यात आणतो, बस एवढंच माझं काम आहे. पण मला वरून ज्या सूचना मिळतात, त्यानुसारच मी कोणाचा 'कार्यक्रम' करायचा आणि कोणाचा 'लावायचा' हे ठरवतो, असेही जयकुमार गोरे यांनी म्हटले.
गोरे यांच्या या खळबळजनक विधानानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, मोहिते-पाटील गट यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.