बंगालमध्ये TMC नेत्यांवरील हल्ले सुरूच
आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर अंडी फेकली, काचांवर बुक्क्यांचा मारा
कोलकाता : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील वातावरण बिघडले असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. विरोधी पक्षाचे नेते, आमदार, खासदार, कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी, खासदार कल्याण बॅनर्जी, खासदार सौगत रॉय यांच्यानंतर आता आमदार कमारहाटीचे आमदार मदन मित्रा यांच्यावर जमावाने हल्ला केला आहे.
मदन मित्र यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली. एवढेच नाही तर बुक्क्यांचा मारा करत काच फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आरियादह भागात शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक आक्रमक जमाव आमदार मदन मित्रा यांच्या गाडीच्या दिशेने धावत जाताना दिसतोय. जमावाने गाडीला घेरून त्यावर अंड्यांचा वर्षाव केला. तसेच काही जणांनी गाडीच्या काचांवर बुक्क्यांनी मारा करत काच फोडण्याचाही प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पुढे दामटली. काही आंदोलकांनी गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार मदन मित्रा म्हणाले की, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी मी गाडीत उपस्थित नव्हतो. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित राजकीय कट असून टीएमसी नेत्यांना बदनाम करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी हे केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपची सत्ता आली. यानंतर बंगालमध्ये तृणमूल नेत्यांवर हल्ले सुरू झाले. महिन्याभरात चार बड्या नेत्यांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. 28 मे रोजी निमटा पोलीस ठाण्याबाहेर ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. त्यानंतर 30 मे रोजी ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूर येथे विटा आणि अंडी फेकून हल्ला करण्यात आला होता. 31 मे रोजी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता आणि आता 6 जून रोजी आमदार मदन मित्रा यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.