Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा!

नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा!

पुणे : खरा पंचनामा 

नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेला भीमराव कांबळे (65) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (25 जून) दोषी ठरवले आहे. आज (29 जून) या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

वास्तविक या खटल्याचा निकाल 25 जून रोजी अपेक्षित होता. त्यावेळी बाजू मांडण्याची संधी साधून आरोपीनी पुन्हा 'तो मी नव्हेच' हेच सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोषी ठरवलेल्या भीमराव कांबळे याला 29 जून रोजी शिक्षा सुनावणार असल्याचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दुपारी सव्वा बारा वाजता सांगितले. त्यामुळे आता आरोपीला फाशीची शिक्षा सुनावणार, जन्मठेप की आजन्म कारावासाची शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी या प्रकरणाशी साधर्म्य असलेली 12 प्रकरणे न्यायाधीशांसमोर सादर केली होती. त्यातील बहुतांश प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती, हेही कोर्टाच्या निदर्शनास आणले होते.

नरसापूरमध्ये 1 मे रोजी अत्यंत लाजीरवाणी घटना घडली होती. भोर तालुक्यातील नसरापूरमधील एका चिमुरडीवरील अत्याचाराने राज्यासह देशात संतापाची लाट उसळली होती. या खटल्याचे काम अत्यंत जलदगतीने करून हे प्रकरण न्यायालयातही तातडीने निकाली लागत असल्यामुळे हा सर्वाधिक जलद निकाल सांगितला जातो. भीमराव कांबळे तीन गुन्ह्यांत दोषी ठरला आहे. त्यातील एका प्रकरणात फाशी, दुसऱ्या प्रकरणात जन्मठेप आणि तिसऱ्या प्रकरणात आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याने दोषी भीमराव कांबळेला कोणती शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात 25 जून रोजी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्याचा एकही नातेवाईक न्यायालयात हजर नव्हता.

हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाकडे सर्व पुरावे सादर करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्याचा वेगाने तपास करून तत्परतेने आरोपपत्र दाखल केले. आरोपीचा गुन्हा क्रौर्याने भरला असून याबद्दल त्याला अजिबात पश्चाताप नाही. मुलीच्या वेदनेची कोर्टाला जाणीव आहे. शिवाय आरोपीने एका महिलेवरही हल्ला केला आहे. आरोपी सुधारण्याच्या पलीकडडे केला आहे. हा गुन्हा त्याने अतिशय थंड डोक्याने केल्याचे निरीक्षण विशेष न्या. एस. आर. साळुंखे यांनी नोंदवले आहे.

1 मे 2026 रोजी नसरापूरमधून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर काही वेळाने तिचा मृतदेह सापडला. यातून अनेक संशयाचा वास आल्याने पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सर्व सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब घेत संशयिताला ताब्यात घेतले आणि अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कमी कालावधीत तपास करून तब्बल 1200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यात आली. सरकार पक्षाने पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने बाजू भक्कम केली. बचाव पक्षानेही त्यांची बाजू मांडली.

घटनाक्रम
1 मे : नसरापूर गावातून साडेतीन वर्षांची मुलगी संध्याकाळी बेपत्ता झाली. रात्री तिचा मृतदेह सापडला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय.
2 मे : पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक गुप्त माहिती तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल केले.
मे पहिला आठवडा : चिमुरडीचा पोस्टमॉर्टेम, न्यायवैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाला. घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर महत्त्वपूर्ण भौतिक पुरावे पोलिसांनी जप्त केले.
16 मे : गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांत पोलिसांनी विशेष न्यायालयात तब्बल 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले.
28 मे : न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून 2026 : सरकारी पक्षाने वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि त्यांची उलटतपासणी पूर्ण करण्यात आली.
20 जून : दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद सुरू झाला. सरकारी पक्षाने पुराव्यांच्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
25 जून : नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे दोषी असल्याचे जाहीर
29 जून : दोषी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.