Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जत येथील पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा सांगलीत खळबळ : एसीबीची कारवाई

दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जत येथील पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर गुन्हा 
सांगलीत खळबळ : एसीबीची कारवाई 

पूजा फडके 
जत (सांगली) : खरा पंचनामा 

भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती १,६०,००० रुपयांची मागणी करणाऱ्या जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देणाऱ्या पोलीस पाटलाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोपींची नावे विक्रम विठ्ठल घोदे (वय ४०, पोलीस कॉन्स्टेबल (ब.नं. १७९६), नेमणूक: जत पोलीस ठाणे), काशीराम कृष्णा माने (वय ३६, पोलीस पाटील, सिद्धनाथ गाव, ता. जत.) अशी आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तक्रारदार यांच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीनंतर १,६०,००० रुपये देण्याचे ठरले. घोदे यांनी ही लाचेची रक्कम मुचुंडी गावाजवळील आर. आर. ढाब्यापाशी सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितले.

पोलीस पाटील काशीराम माने यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली आणि तक्रारदाराला त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल न होण्यासाठी विक्रम घोदे यांना पैसे देण्यास प्रोत्साहन दिले. तसेच घोदे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदाराच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली युनिटने २० एप्रिल २०२६ रोजी पडताळणी कारवाई केली. यामध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, ३० जून २०२६ रोजी जत पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. ३८१/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई सांगली एसीबीच्या पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  योगेश चव्हाण आणि अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार व इतर सहकाऱ्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.