नायजेरियन लोकांपर्यंतही पोहोचले अशोक खरातचे अश्लील कांड
व्हिडिओ होतायत तुफान व्हायरल, सायबर पोलीस अॅक्शनमोडवर
नाशिक : खरा पंचनामा
काही दिवसांपूर्वी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले होते. आरोपी खरातने पूजा विधी करण्याच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. हा सगळा प्रकार छुप्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पसरवणाऱ्या तब्बल ७४ टेलिग्राम ग्रुप्स आणि सोशल मीडिया खात्यांचा शोध सायबर पोलिसांनी लावला आहे. इंटरनेटवरून अशा आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करत असताना आतापर्यंत ४०६ आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरून यशस्वीरित्या हटवण्यात आले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, ११ सोशल मीडिया मध्यस्थांना सायबर पोलिसांकडून कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी २५ सोशल मीडिया खात्यांकडून पोलिसांना प्रतिसाद प्राप्त झाला असून पुढील कारवाई सुरू आहे.
सायबर पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही टेलिग्राम ग्रूप्सवर हे कथित अश्लील व्हिडिओ अवघ्या २० रुपयांसारख्या किरकोळ किमतीला विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी एका मुख्य संशयित आरोपीची ओळख पटवली असून, सध्या त्याची पडताळणी सुरू आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहेत. हा व्हिडिओ युएई (UAE), श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांमध्येही पसरल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, भारतातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या संदर्भात नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी असे कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड, खरेदी किंवा कोणालाही फॉरवर्ड करू नयेत. अशा व्हिडिओंचा प्रसार करणे किंवा ते जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडियावर अशी कोणतीही लिंक, टेलिग्राम ग्रुप किंवा संशयास्पद खाते आढळल्यास त्याची माहिती तत्काळ सायबर पोलिसांकडे देऊन तक्रार नोंदवावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांचे विशेष पथक करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.