Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केतनचा डमी पुतळा कड्यावरून ढकलत पोलिसांनी उलगडला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम

केतनचा डमी पुतळा कड्यावरून ढकलत पोलिसांनी उलगडला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम

पुणे : खरा पंचनामा 

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी मोठी मोहीम राबवली आहे. या गुन्ह्याची संपूर्ण उकल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी लोहगड किल्ल्यावर जाऊन 'क्राईम सीन रिक्रिएशन' (घटनास्थळाचे प्रात्यक्षिक) पूर्ण केले. या अत्यंत महत्त्वाच्या तपासासाठी मुख्य आरोपी सिया गोयल हिला कडक पोलीस सुरक्षेत गडावर नेण्यात आले होते.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी मोहीम पार पडली. लोहगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने, तपासामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सकाळी 6 ते 11 या वेळेत पर्यटकांना गडावर जाण्यापासून रोखण्यात आले होते. तपासाचे काम अधिक अचूक व्हावे यासाठी पोलिसांनी केतन अग्रवाल यांच्या उंची आणि वजनाशी तंतोतंत जुळणारा एक 'डमी' पुतळा तयार केला होता. या पुतळ्याच्या साहाय्याने, आरोपीने केतनला नक्की कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणाहून दरीत ढकलले असावे, याचे हुबेहूब नाट्य पोलिसांनी तिथे घडवून आणले.

तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, केतनला संपवण्याचा कट पुण्याच्या कोंढवा भागातील लुल्लानगर परिसरातील एका कॅफेमध्ये शिजला होता. नियोजित कटानुसार, 18 जून रोजी सिया केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली, तर तिचा साथीदार चेतन चौधरी तिथे आधीच दबा धरून बसला होता. कड्याच्या टोकावर पोहोचल्यानंतर सियाने दिलेल्या इशाऱ्यावर चेतनने मागून येऊन केतनला खोल दरीत ढकलून दिले.

या संपूर्ण प्रात्यक्षिकाचे पोलिसांनी हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांतून चित्रीकरण केले आहे. या मोहिमेनंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "गुन्हा नेमका कसा घडला आणि आरोपींच्या हालचाली कशा होत्या, हे सिद्ध करण्यासाठी हे रिक्रिएशन खूप गरजेचे होते. दरम्यान, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.