Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विटा एसटी स्टँडवरील दागिने चोरीचा गुन्हा उघडकोल्हापूरच्या महिलेकडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

विटा एसटी स्टँडवरील दागिने चोरीचा गुन्हा उघड
कोल्हापूरच्या महिलेकडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एका महिलेला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून ६ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि चोऱ्या उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार अरुण पाटील यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक महिला आष्टा बसस्थानक परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरत आहे. पथकाने तातडीने तिथे जाऊन पाळत ठेवली असता, एक महिला घाईघाईने बसस्थानकाबाहेर पडताना दिसली. संशय आल्याने महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांच्या मदतीने तिला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव कविता सतीश काळे (वय ४६ वर्षे, रा. कनान नगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे आहे. महिला पोलीस अंमलदार सपना गराडे यांनी पंचांसमक्ष तिची अंगझडती घेतली असता, तिच्या जवळील पर्समध्ये एका कागदी पुडीत सोन्याचे दागिने (गंठण आणि बांगड्या) तसेच रोख रक्कम आढळून आली.

या मुद्देमालाबाबत अधिक चौकशी केली असता, तिने दोन महिन्यांपूर्वी (७ एप्रिल रोजी) विटा एस.टी. स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून हे दागिने चोरल्याची कबुली दिली. विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात शितल रविंद्रकुमार जाधव (रा. हातनूर, तासगाव) यांनी आधीच चोरीची तक्रार नोंदवली होती.

तिच्याकडून सोन्याचे दागिने (गंठण आणि बांगड्या) किंमत ६ लाख ९०,००० हजार, रोकड जप्त करण्यात आली. सदर आरोपी महिला आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोलीस अंमलदार उत्तम माळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपना गराडे, अरुण पाटील, संदीप गुरव, उदयसिंह माळी, मच्छिंद्र बर्डे, सुरज थोरात आणि विनायक सुतार यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.