Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

ठाणे : खरा पंचनामा 

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका छापखान्यातील कर्मचारी ते परीक्षा केंद्रांपर्यंत वाहतूक करणाऱ्या संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी राजीव शाव, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना भिवंडी परिसरातून अटक केली होती. या तिघांनी प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळवली, ती कोणाच्या माध्यमातून मिळाली आणि पेपरफुटीच्या या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. रविवारी दुपारी तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी न्यायालयासमोर आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

टीईटीच्या प्रश्नपत्रिका कुठून आणण्यात आल्या, त्या कोणत्या पद्धतीने मिळवण्यात आल्या, त्यासाठी कोणाशी संपर्क साधण्यात आला तसेच आर्थिक व्यवहार कशा प्रकारे झाले, याचा तपास करायचा असल्याने पोलिसांनी आरोपींची १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. दरम्यान, आरोपी आकाश कुमार आणि राजीव शाव यांच्या वतीने वकील शैलेश गायकवाड यांनी, तर धीरज सिंग याच्या वतीने दिल्लीतील वकील सतेंद्र रेढू यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तिघेही आरोपी बिहार आणि हरियाणा राज्यातील असल्याने त्यांना टीईटीच्या प्रश्नपत्रिका नेमक्या कोणत्या माध्यमातून आणि कोणाच्या मदतीने प्राप्त झाल्या, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका फुटीमागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांत प्रश्नपत्रिका छपाई कारखान्यातील कर्मचारी, प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणारे कर्मचारी तसेच या प्रक्रियेशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात कोणाचा सहभाग होता, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.