लाच घेताना एकाच वेळी तीन पोलीस अंमलदारांना अटक
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन विभागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर पथकाने पकडत मोठी कारवाई केली आहे.
अपघात प्रकरणाची माहिती आय आर ए डी मध्ये नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी 7000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराच्या भावाचा एक जून रोजी अपघात झाला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी दौंड येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर दौंड पोलिसांनी जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी संबंधित प्रकरण श्रीगोंदा पोलिसांकडे हस्तांतरित केले. हे प्रकरण पोलीस कर्मचारी नितीन गाडगे यांच्याकडे होता. तपासादरम्यान गाडगे यांनी अपघाताची माहिती आय आर ए डी अॅप मध्ये भरण्यासाठी त्यांचा सहाय्यक रावसाहेब जाधव याला भेटण्यास सांगितले.
संबंधित तक्रारदाराने जाधव यांच्याशी संपर्क साधल्यावर जाधवने अपघाताची माहिती अॅपमध्ये भरून संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी घाडगे यांच्यासाठी दहा हजाराची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहिल्यानगर पथकाकडे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर 7000 रुपयांवरती तळजोड ठरली. आरोपींनी ही रक्कम श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सरकारी वाहन चालक दादाराव मस्के यांच्याकडे देण्यात सांगितले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला व मस्के यांनी सात हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये नितीन अशोक गाडगे, रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक दादाराव मस्के अशी कारवाई झालेल्या तिघांची नावे आहेत.
या प्रकरणामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एकाच वेळेस तीन लाचखोर पोलिसांना एसीबीने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशाच लाचखोर पोलीस प्रशासनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.