'इंडिया'च्या दिल्लीतील बैठकीपूर्वी शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्या फोटोसह झळकले राहुल गांधींविरोधात बॅनर्स
नवी दिल्ली : खरा पंचनामा
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर टीका करणारे अनेक फलक दिल्लीत झळकले आहेत.
विशेष म्हणजे हे फलक इंडिया आघाडीतील नेत्यांच्याच नावाने दिल्लीत लावण्यात आले आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, केजरीवाल या नेत्यांचे फोटो फलकावर लावून राहुल गांधींवर टीका करण्यात आली आहे. या नेत्यांच्या फोटोसह राहुल गांधींवरील टीकेची जुनी वक्तव्य फलकांवर लिहण्यात आली आहेत.
तमिळनाडूत काँग्रेसने डीएमकेची साथ सोडून नव्याने उदयास आलेल्या टीव्हीकेचा हात धरुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाराज असणारी डीएमके इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. आघाडीसाठी हा एक धक्का मानला जात असताना आता, बैठकीपूर्वी झळलेल्या फलकांमुळे आघाडीत सर्व आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीत फलकांवर शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, उदयनिधी स्टॅलिन, भगवंत मान यांची राहुल गांधीवरील टीकेची जुनी वक्तव्य लिहण्यात आली आहेत.
तमिळनाडूत काँग्रेसचा टीव्हीकेबरोबर जाण्याचा निर्णय न रुचल्याने डीएमकेने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. डीएमके नेते टीकेएस एलानगोवन यांनी नाराजी व्यक्त करताना अनेक पक्ष इंडिया आघाडी सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूचक वक्तव्य केले. काँग्रेसवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही म्हणत एलानगोवन पक्षालवर टीकास्त्र सोडले. "आमचे केडर काँग्रेसवर नाराज आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीची बैठक बोलवली आहे. आमच्याबरोबर युतीकरुन विजयी झाल्यानंतर त्यांनी टीव्हीकेबरोबर सत्तेत जाणे पसंद केले. स्थानिक निवडणुकीत देखील त्यांनी टीव्हीकेबरोबरच लढण्याचा मानस व्यक्त केला आहे", असे एलानगोवन म्हणाले.
"असे असताना आमचे केडर कसं इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावू देईल? त्यामुळेच आम्ही बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक घटक पक्ष काँग्रेसवर टीका करेल कारण त्यांना देखील फटका बसला आहे. आप देखील बैठकीला हजर राहणार नसल्याचे मी ऐकलं आहे. लालू प्रसाद यादव आणि बाकीचे काय निर्णय घेतात पाहावं लागेल. काँग्रेस मित्रपक्ष बदलत आहेत आणि ते असं कसं करु शकतात?", असा सवाल डीएमके नेते एलानगोवन म्हणाले. अनेक मित्रपक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडतील असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २३ पक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आघाडी फूटीच्या प्रश्नावर बोलताना जयराम रमेश यांनी विरोधकांची आघाडी एकत्रित असल्याचे स्पष्ट केले. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर उद्धव ठाकरे व्हर्चुअल पद्धतीने या बैठकीत सहभागी होतील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.