रात्रभर पोलिसांनी शोधून सापडले नाही, आता खान सर थेट कोर्टात पोहोचले; गुन्हा दाखल झाल्यानंतर शरणागती
पाटणा : खरा पंचनामा
प्रसिद्ध शिक्षक फैसल खान उर्फ खान सर यांच्याविरोधात कथित गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, आता ते थेट न्यायालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
आत्मसमर्पणासाठी ते पाटणा येथील दिवाणी न्यायालयात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
न्यायालय परिसरात माध्यमांना प्रवेश नसल्याने खान सर नेमके कधी न्यायालयात पोहोचले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने या प्रकरणाबाबत विविध चर्चाना उधाण आले आहे.
मंगळवारी रात्री पाटणा येथील खान सर यांच्या 'खान ग्लोबल स्टडीज' या संस्थेबाहेर मोठा गोंधळ उडाला होता. १५ ते २० अज्ञात व्यक्तींनी संस्थेवर हल्ला करत दगडफेक आणि तोडफोड केल्याचा आरोप आहे. यावेळी गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर यासंबंधीचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये संस्थेचे दोन सुरक्षा रक्षक हवेत गोळीबार करत असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी फैसल खान यांचे नाव नमूद करून गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली होती. तसेच या घटनेचा सखोल तपास सुरू असून खान सर यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, खान सर न्यायालयात पोहोचल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.