Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"देशात 10 वर्षांत पेपरफुटीच्या 152 घटना, पण एकालाही शिक्षा नाही"

"देशात 10 वर्षांत पेपरफुटीच्या 152 घटना, पण एकालाही शिक्षा नाही"

डेहराडून : खरा पंचनामा 

देशातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या दहा वर्षांत देशभरात तब्बल 152 पेपरफुटीच्या घटना घडल्या असून त्याचा थेट परिणाम सुमारे साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झाला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये आजपर्यंत एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. त्यामुळे देशातील परीक्षा यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, टीव्ही आणि वृत्तपत्रांमधून समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटना या हिमनगाच्या केवळ टोकासारख्या आहेत. प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार खूप मोठा आणि खोलवर रुजलेला काळा व्यवसाय बनला आहे. विविध राज्यांतील भरती परीक्षा प्रश्नपत्रिकांचे व्यवहार खुलेआम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी तर पेपर विक्रीचे दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून हा काळाबाजार चालत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी या कथित रॅकेटमध्ये कोचिंग क्लासेस, प्रश्नपत्रिका तयार करणारे घटक तसेच काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या व्यवस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात उत्पादन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योजकता आणि खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारी नोकरी हीच लाखो तरुणांसाठी शेवटची आशा उरली आहे. मात्र या मार्गावरही भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे संकट उभे असल्याची टीका त्यांनी केली.

सरकारी नोकरीसाठी स्पर्धा किती तीव्र आहे याचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, एका विद्यार्थ्याच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कुटुंबाला सरासरी पाच वर्षांत सुमारे नऊ लाख रुपये खर्च करावे लागतात. देशभरात जवळपास नऊ कोटी तरुण सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र उपलब्ध जागा केवळ सहा लाख आहेत. म्हणजेच 150 उमेदवारांमागे फक्त एका उमेदवाराला नोकरीची संधी मिळते. अशा परिस्थितीत जर परीक्षा प्रक्रियेलाच पेपरफुटीचा ग्रहण लागले, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे मोठे नुकसान होते, असे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात रिया कुमारी या २३ वर्षीय विद्यार्थिनीचाही उल्लेख केला. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या बातम्यांमुळे ती मानसिक तणावात गेली आणि तिने आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. रियाचे वडील रमेश बाल हे देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा प्रश्न नसून लाखो कुटुंबांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा आणि स्वप्नांचा अपमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

देशातील परीक्षा प्रणालीत मूलभूत बदल करण्याची गरज असल्याचे सांगताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी-केंद्री दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. सॅट, जीमॅट यांसारख्या आधुनिक आणि सुरक्षित परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून भारतातही त्याचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रणालीमध्ये एका वर्गातील विद्यार्थ्यांनाही वेगवेगळे प्रश्नसंच मिळू शकतात, त्यामुळे पेपरफुटीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, परीक्षा प्रक्रिया खासगी संस्थांकडे सोपवून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. विद्यापीठांचे कुलगुरू, परीक्षा मंडळांचे प्रमुख आणि महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमधील अधिकारी यांची नियुक्ती राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावी, अशी मागणी त्यांनी केली. देशातील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि तांत्रिक सुरक्षा वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.