मिरजेत रोडरोमियोंवर महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई
४२ दुचाकी जप्त, ३३,९०० रुपयांचा दंड वसूल
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांसाठी विनानंबर आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने रोडरोमियोंवर एक मोठी धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विनानंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेट आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या ४२ दुचाकींवर कायदेशीर कारवाई करत एकूण ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली होती. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार केली होती.
या पथकांनी मिरज शहरातील कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान या प्रमुख ठिकाणांसह शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात अत्यंत सतर्कतेने गस्त घातली. या दरम्यान अचानक नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
शुक्रवार, ३ जुलै २०२६ रोजी दिवसभर राबवलेल्या या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विनानंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेट आणि नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोडरोमियोंच्या एकूण ४२ मोटारसायकली ताब्यात घेतल्या. या सर्व वाहनांची आणि वाहनचालकांची कागदपत्रे तपासून, त्यांची ओळख पटवून पोलिसांनी कडक दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी एकूण ३३,९००/- रुपयांचा दंड वसूल केला आहे.
संशयास्पद वाहनचालक आणि रोडरोमियोंविरोधात सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाची ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात राबवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारची संशयास्पद वाहने किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने 'डायल ११२' (Dial 112) या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सचिन कुंभार, राहुल क्षीरसागर, सर्जेराव पवार, फैयाज बारगीर, नानासाहेब चंदनशिवे, अमोल तोडकर, सुनील माने, कोंडीबा सरगर, विजय शेरेकर, संतोष माळी, गोरख सुतार, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, विजय शिंदे तसेच चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील आणि चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर खोंद्रे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.