घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
सांगली, पिंपरी आणि गुजरात मधील गुन्हे उघड
पूजा फडके
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-०१ ने अत्यंत मोठी आणि धडक कारवाई करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली आणि थेट गुजरात मधील वापी येथील एकूण ८ घरफोडीचे आणि १ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ११ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई (२०० CCTV आणि डम डेटाचे विश्लेषण)
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलीस अंमलदार महेश पाटील यांनी मिळवलेला डम डेटा आणि फिंगरप्रिंट विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनि नाथा भुजबळ यांनी दिलेल्या बोटांच्या ठशांच्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.
यानंतर, 'हे आरोपी पुण्यातून गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असून सध्या रेंजहिल्स, खडकी परिसरात थांबले आहेत', अशी खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार साई कारके आणि महेश पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी खडकी परिसरात सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे धनंजय हरीष काळे (वय २१, रा. पिंपळे गुरव, पुणे), यश उर्फ गट्या दत्ता देशमुख (वय १९, रा. भारतनगर, पिंपरी), एक विधीसंघर्षीत बालक (वय १६, रा. चिंचवड) अशी असून
आरोपींनी चोरलेला माल विकण्यासाठी मदत करणारा हॉटेल व्यावसायिक मोहन नागनाथ नवले (वय ३९, रा. पिंपरी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मतीन कुरेशी (रा. काळेवाडी) या नावाच्या आणखी एका साथीदाराचे नाव समोर आले आहे. आरोपी आणि रिसीव्हर मोहन नवले यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने असा एकूण ११,११,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीसह इतर जिल्ह्यातील उघड झालेले गुन्हे
आरोपींनी पुणे, पिंपरी आणि थेट गुजरातमध्येही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून खालील ९ गुन्हे उघडकीस आले आहेत: यात कोथरूड पोलीस स्टेशन (पुणे): २ गुन्हे (गु.र.नं. २२७/२०२६ आणि २२८/२०२६), बिबवेवाडी पोलीस स्टेशन (पुणे): १ गुन्हा (गु.र.नं. २१२/२०२६), सहकारनगर पोलीस स्टेशन (पुणे): १ गुन्हा (गु.र.नं. २२८/२०२६), दिघी पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड): १ गुन्हा (गु.र.नं. २२३/२०२६), संजयनगर पोलीस स्टेशन (सांगली): तब्बल ३ गुन्हे (गु.र.नं. २१८, २१९, २२०/२०२६), वापी पोलीस स्टेशन (वलसाड, गुजरात): १ गुन्हा (गु.र.नं. ९७२/२०२६). पुढील तपासासाठी सर्व आरोपींना आणि जप्त मुद्देमालाला कोथरूड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त शंकर खटके आणि पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पो.उप.निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार साई कारके, महेश पाटील, साधना पवार, अमित गद्रे, बाळू गायकवाड, रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदिप राठोड, गणेश ढगे, शिवाजी सातपुते आणि चालक बनकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.