Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील १७ पोलीस ठाण्यांमधील २ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ जाळून नष्ट!

सांगलीतील १७ पोलीस ठाण्यांमधील २ कोटी १५ लाखांचे अमली पदार्थ जाळून नष्ट!

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई केली आहे. जिल्ह्यातील १७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ६५ गुन्ह्यांमधील तब्बल २ कोटी १५ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थांचा मुद्देमाल आज, ९ जुलै रोजी अधिकृतपणे जाळून नष्ट करण्यात आला.

सांगलीचे पोलीस अधीक्षक आणि 'अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी'चे अध्यक्ष तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. मिरज एम.आय.डी.सी. येथील 'सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी प्रा. लि.' येथे कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून हा सर्व मुद्देमाल बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला. यामध्ये खालील अमली पदार्थांचा समावेश होता:
 गांजा: १,०२१ किलो ग्रॅम
 कोकीन: २७६ ग्रॅम
 एकूण किंमत: ₹ २,१५,००,०००/-

२००९ पासूनचा साठवलेला मुद्देमाल
पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील विविध १७ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. (NDPS) अ‍ॅक्ट १९८५ अंतर्गत लागवड, वाहतूक, विक्री आणि अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी सन २००९ ते २०२६ या कालावधीत गुन्हे दाखल झाले होते. हा जप्त केलेला सर्व मुद्देमाल केंद्रीय अंमली पदार्थ गोदामात जमा होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) माननीय न्यायालय, पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), सीआयडी (पुणे) आणि इतर केंद्रीय यंत्रणांकडून कायदेशीर परवानगी मिळवून ही प्रक्रिया पूर्ण केली. एन.डी.पी.एस. अ‍ॅक्टच्या कलम ५२ (अ) नुसार हा साठा नष्ट करण्याचे आदेश मिळवण्यात आले होते.

हा अमली पदार्थांचा साठा नष्ट करताना आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि प्रदूषण होणार नाही, याची काटेकोर काळजी घेण्यात आली. दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ही कारवाई अमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सदस्य अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गजानन सरगर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झाली. तसेच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, रासायनिक विश्लेषक (कोल्हापूर विभाग), वैध मापन शास्त्र विभाग, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. एलसीबीच्या पथकातील अतुल माने, सोमनाथ पतंगे आणि १७ पोलीस ठाण्यांच्या मुद्देमाल कारकुनांनी या संपूर्ण मोहिमेसाठी विशेष पाठपुरावा केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.